Friday, 20 January 2012

आम्ही धनगर

कै. शिवाजीराव (बापू) शेंडगे व्यक्ती आणि कार्य .
शिवाजीराव कृष्णराव शेंडगे उर्फ बापू, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खेडयातून राज्याच्या राजधानीपर्यंत पोहचलेलं नेतृत्व. केरेवाडी सारख्या दुष्काळी भागातील खेडयात जन्माला आलेले बापू, स्वकर्तृत्वावर मंत्रालयातील राज्यमंत्र्यांच्या केबीनमध्ये जावून मंत्र्यांच्या खुर्चीत आरूढ होतील. हे स्वप्नातही कोणाला वाटले नसते. परंतु संघटन कौशल्य, मधुरवाणी, साधी राहणी, सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची सवय, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव. या त्यांच्या गुणांमुळेच शिवाजीचे शिवाजीराव झाले. दुष्काळग्रस्त भागातील सर्व सामान्यांचे दैवत झाले. राज्यातील तमाम धनगर समाजाचे कैवारी ठरले.
बापू केरेवाडीचे असले तरी त्यांचा उमेदीचा सास काळ मुंबईत गेला. मुंबईतील गोदीशी आणि बंदराशी एकरूप झालेले बापू नकळत राजकारणात आले आणि तमाम धनगर समाजाचा पांग फिटला नाही तर गोदीतील कामगार, अवजड वाहने, यंत्रसामुग्री आणि वाहतुकीच्या व्यापात बापू अडकून पडले असते. स्वर्कृत्व म्हणजे काय असं जर कोणी विचारलं, तर त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणून शेंडगेबापूंच्याकडे बोट दाखविले पाहिजे.
आपल्या उमेदीच्या काळात असुरक्षित आणि असंघटित कामगाराना एकत्र करून समाजात त्यांची पत वाढविण्याचे मोलाचे कार्य बापूंनी केले. आजमितीला मुंबई गोदीतील कामगार स्वत:च्या पायावर उभे राहीले आहेत. सेवानिवृत्ती नंतर या कामगारांना आर्थिक चिंता भासणार नाही इथपर्यंत त्यांची सोय करून देण्याचे पुण्यकर्म बापूंनी केले आहे. एक सामान्य माणूस जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर काय करू शकतो हे बापूंनी दाखविले. बापू मोठे झाले ते कांही त्यांना एखादे घबाड मिळाले म्हणून नव्हे तर कष्टाचे, जिद्दीचे घबाड स्वत:च्या घामातून ओथंबून त्यांनी मिळविले. अर्थात पैसा, संपत्ती हेच सर्वस्व मानने हे बापूंच्या स्वभावात कधीच नाही. त्यामुळेच त्यांना मिळत गेलेल्या यशाची कमान चढती ठरली. बापू आज मंत्री आहेत म्हणून त्यांच्या गौरवार्थ कोणी चार शब्द उधळू नयेत, कारण अवास्तव स्तुती देखील त्यांना आवडत नाही. पांढरे शुभ्र धोतर, तसलाच नेहरू सदरा, करारी चेहरा, बोलके डोळे, दिसायला आकर्षक नसले तरी लोकांच्या मनांतील भाव ओळखण्याची ताकद असलेली त्यांची नजर, समोर आलेला प्रत्येक माणूस किमान समाधानाने परत जाईल इथपर्यंत त्याच्याशी बोलणारे बापू पाहिले की ख-या अर्थाने ते लोकांचे नेते आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे नेते आहेत. असेच वाटून जाते.
मुंबईला नोकरीसाठी बापू केरेवाडी सोडून गेले. अगदी खिन्न मनाने आणि केवळ पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी मुंबई गाठली. त्यावेळची मुंबईतील परिस्थिती तर बिकटच होती. रोजंदारीवर काम करायचे. चार पैसे मिळवायचा एवढाच त्यावेळी त्यांचा हेतू्. परंतु त्यांच्या संघटन कौशल्याने, मनमोकळया आणि दिलखुलास स्वभावामुळे बापूंनी आजूबाजूचे कामगार एकत्र केले. त्यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी ते पुढाकार घेऊ लागले. त्यावेळचे प्रसिद्ध कामगार नेते आणि कॉग्रेसचे एक नेते श्री मनोहर कोतवाल यांनी बापूंच्या अंगातील गुणांची पारख केली आणि शेंडगेबापूंच्याकडे कामगारांचे संघटन सोपविले. कोतवाल यांनी दिलेल्या संधीचा लाभ बापूंनी चांगल्या प्रकारे उठविला. तमाम कामगारांना एकत्र केले. त्यांचे हक्क आणि कर्तव्ये याची जाणीव करून दिली. त्यावरून बापूंचे नेतृत्व केले. त्यांचे कामगारांचे संघटन करता करता बापूंनी आपल्या दुष्काळी भागातील कवठे महांकाळ तालुक्यातील एकेक करीत असंख्य हाताना काम मिळवून दिले. दुष्काळी भागात पाऊस नाही. म्हणून पिके नाहीत, पिके नाहीत म्हणून लोकांना रोजगारासाठी विविध क्षेत्रे शोधावी लागली. आरेवाडी व परिसरातील खेडयातील बेकार तरूणांना मुंबईतील गोदीत काम मिळवून देण्याचे काम बापूंनी केले.खाली दिमाग सैतान जैसा, हे बापूंनी ओळखले आणि रोजगारासाठी वणवण भटकणा-यांच्या हातांना काम मिळवून दिले. बापूंचे कामगार संघटनातील कौशल्य अद्वितीयच म्हटले पाहिजे. मुंबई सारख्या प्रचंड मोठया शहरात आणि त्यातही असंख्य जाती जमातीच्या लोक समुहात रहायचे आणि स्वत:च्या कर्तृत्वावर कामगार क्षेत्रात पकड बसवायची, हे एक ध्येय्य म्हणून बापूंनी केले. दुस-याला मदत करण्याची त्यांची सात्वीक, प्रवृती, प्रसंगी अन्याय, अत्याचार किंवा दडपशाहीविरोधी सात्वीक संताप व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव, यामुळे कामगार वर्गात त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले. गोदी कामगार, माल ट्रक वाहतुक कामगार, हमाल मंडळी या विषयी अपार प्रेम, माया बाळगणारे बापू खेडयातील माणसाला कधी विसरले नाहीत. खेडयातील जमीनी, पाण्या अभावी होणारी लोकांची परवड, शिक्षणाअभावी खेडयापाडयात वाढणारे अज्ञान आणि अंधश्रद्धा याचा नेहमीच कळवळा बापूंनी व्यक्त केला आहे. बापू मुंबईत राहीले तरी त्यांचे सारे लक्ष दुष्काळी भागाकडे असते. अगदी मंत्री झाले तरी देखील. गोदीतील कामगारांच्या संघटनाबरोबर बापूंनी वाहतुक व्यवसायात पाय रोवले. हा व्यवसाय चांगला चालला. हाताखाली लोक आले. मनोहर कोतवालासारख्या मातब्बर नेत्याचे मार्गदर्शन लाभले आणि बापूंनी एका पाठोपाठ एक अशी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास सुरूवात केली.
बापूंनी कॉग्रेसमध्ये यावे आणि निवडणुकीच्या राजकारणात पडावे अशी अनेकांची इच्छा होती. तथापी योग्य वेळी वाट पाहण्यात बापू गढून गेले होते. स्व. राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली देशभरात कॉंग्रेस पक्ष लोकांसमोर विविध विकासाचा कार्यक्रम घेवून जात होता. त्याच क्षणी बापूंनी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचे ठरविले. पैसा, संपत्ती आणि माणसाचा संग्रह असताना बापूंना मुंबईतल्या कोणत्याही भागातून निवडून येता आले असते. किंबहूना विधान परिषदेवर जाता आले असते. परंतु तसे न करता बापूंनी स्वत:च्या दुष्काळी भागातील मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि कॉंग्रेस पक्षानेही त्यांना उमेदवारी दिली. मूळचा कामगाराचा पिंड, त्यानंतर कामगारांचे नेतृत्व आणि या नेतृत्वाचा विकास साधण्याचे काम मा. शरद पवार, मा. शिवाजीराव देशमुख व कॉंग्रेस (आय) पक्षाच्या नेत्यांनी केले. बापूंनी तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराचे काम लोकांनी केले. कोणालाही एखादया शब्दानेही न दुखविण्याचा स्वभाव असलेले बापू प्रचार सभातून केवळ मी पक्षाचा उमेदवार आहे या मतदार संघाच्या विकासासाठी झटण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. एवढेच सांगत असत. नाहीतर अन्य राजकारणी पुढा-याप्रमाणे बापूंनी कधीही पोकळ आश्वासने दिली नाहीत, की दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न करताच स्वार्थ साधला नाही. बापू निवडून आले नंतर पक्षाने त्यांच्यावर राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली. या संधीचा पुरेपूर फायदा न उठवला तर मग ते बापू कसले? बापूंनी सर्व प्रथम महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला संघटित करण्याचे काम केले. वर्षातील आठ महिने भटकंती करणारा हा धनगर समाजाला तसा कष्टाळू, शे-दोनशे शेळया मेंढया घेऊन स्वत:चे घर, गांव सोडून अन्य भागात फिरत रहायचे, स्वत:बरोबर कुटुंब, लहान मुले, घोडी, कुत्री आणि खांदयावर घोंगडी, तोंडातून थिर्रर्र असा आवाज काढीत फिरत रहायचे, ना कोणी ओळखीचे की पाळखीचे, परकी गावे, परकी जमीन, हातात फक्त पाला तोडण्यासाठी कु-हाड, जित्राब सांभाळायचे, सुरक्षितता नाही. जवळ हत्यार नाही. कोणी रात्री अपरात्री शेळया मेंढया उचलून नेल्या तर ब्र काढायचा नाही. शेळया मेंढयाचे दूध आणि मिळेल ती भाकरी एवढेच जेवण. वंशपरंपरागत चालत आलेले अडाणीपण. वर्षातील आठ महिने भ्रमंती म्हणून मुला बाळांना शिक्षण नाही. अशा या मागास समाजाला न्याय देण्यासाठी बापूंनी राज्य भरातील धनगर समाजाची परिषद घेण्याचे ठरविले. आनंदराव देवकाते, आ. ऍड. विजयराव मोरे यांच्यासह अनेक नेत्यांना एकत्र आणले. सांगलीत धनगर समाजाचा मेळावा घ्यायचा. त्यात समाजाची गा-हाणी मांडायची असा हट्टच बापूंनी धरला.
हा मेळावा यशस्वी करण्याचे सारे श्रेय बापूंनाच. कारण स्व. पंतप्रधान राजीव गांधी हे या मेळाव्याला उपस्थित राहिले. धनगर समाजाचा पांग फिटला. राजीव गांधीच्या गळयात धनगरी ढोल आणि खांदयावर घोंगडे ठेवण्यात आले. सारा समाज रोमांचित झाला. आपला कोणीतरी देव आहे. नेता आहे. असेच सा-यांना वाटले आणि बापूंच्या नावाचा जयजयकार झाला. राजीव गांधीनी या समाजाच्या अडीअडचणी जवळून पाहिल्या त्यामुळे धनगर समाजाला प्रथम एन.टी. मध्ये आरक्षण मिळाले, त्यानंतर शरद पवारांच्या प्रयत्नांने या समाजाला न्याय मिळाला. नोकरीत आरक्षण, शेळया मेंढया चारण्यासाठी परवानगी, स्वरंरक्षणासाठी हत्यारांचे परवाने, कातडी कमावण्याचे छोटे छोटे उद्योग प्रकल्प, लोकरीसाठी प्रकल्प अशा एक ना अनेक मागण्या मंजूर झाल्या. या साऱयाचे श्रेय बापूंच्याकडे जाते. धनगर समाजाच्या दृष्टीने बापू हे महान ठरले. देशाच्या दृष्टीने महात्मा गांधीजी हे बापूजी ठरले, मात्र महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या दृष्टीने शेंडगेबापू बापूजी ठरले आहेत. सत्ता आणि पद याचा माध्यम म्हणून वापर करून समाजाचा, लोकांचा विश्वास कसा करायचा हे बापूंनी दाखवून दिले. मग ते दुधाचा धंदा असो, लोकरीचा असो नाहीतर ग्रामीण रोजगार योजना असो. लोकांच्या रिकम्या हाताला काम देणे , सर्व सामान्य लोकांचा सर्वंकष विकास साधणे एवढेच ध्येय बापूंनी डोळयासमोर ठेवले आहे.
सांगलीचा धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यापाठोपाठ पंढरपूरचा मेळावा झाला. या दोन्हीही मेळाव्यांचे फलद्रुप म्हणजे धनगर समाजाला मिळालेले आरक्षण. बापू केवळ धनगर समाजासाठी झटत आहेत असे मुळीच नाही. सर्वच समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय देण्याचे काम ते करीत आहेत. स्वत: माळकरी स्वभावाचे, शाकाहारी प्रवृतीचे बापू आजही मोठया जिद्दने, उमेदीने काम करीत आहेत. सर्व साधारणपणे माणूस साठ वर्षाचा झाला की सर्वच कामातून निवृती घेतो. परंतू बापूंच्या ठायी निवृती नाही, की स्वत:चे असे कांही पाहणे नाही. उर्वरीत काळ महाराष्ट्रतील तमाम कष्ठकऱयांच्या, गोरगरीबांच्या उत्थानासाठी खर्ची घालणे , अर्धशिक्षीत निरक्षरांना साक्षर करून त्यांच्या घरा पर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविणे , खेडय़ापाडय़ातील लोकांचे आर्थिक जीवनमान उंचविणे , याबरोबरच शासनाच्या विविध योजना गरजूना आणि अविकसीत भागातील लोकांपर्यत पोहोचविणे साठी बापू कार्यरत आहेत. अनेक राजकीय पुढाऱयांचे आणि नेत्यांचे वाढदिवस साजरे होतात, सभा संमेलने समारंभ होतात, परंतु एका खेडूत माणसाचा, उपेक्षीत समाजातील माणसाचा,सहृदयी, संवेदनशील, चारित्रयवान माणसाचा षष्टयब्दीपूर्ती समारंभ व्हावा ही कल्पनाच मुळी उल्लेखनीय आणि अव्दितीय म्हटली पाहिजे. शेंडगे बापूंचा आज 62 वा वाढदिवस. 63व्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत. परंतु एखाद्या तरूणाला लाजवेल अशी त्यांची कृती आहे. अजूनही अंगात धमक आहे. जिद्द आहे, कष्ट करायची तयारी आहे. ती केवळ उपेक्षीतासाठी, दिनदुबळया आणि असुरक्षित, असंघटित लोकांसाठी, अशी माणसं गावा गावात तयार झाली, निर्माण झाली तर राज्याचे, या राष्ट्राचे काय होईल तर सारा समाज विकासाच्या उंबरठय़ावर उभा राहील् आणि बापूसारख्या अशा महान कर्तृत्ववान नेत्यांच्या चरणी नतमस्तक होईल. बापू तुम जियो हजार साल, सालके दिन हो पचास हजार असे सारेजण म्हणतील. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या यशातील व्यक्ती वेगळयाच असतात. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या यशाच्या पाठीमागे स्त्री असते असे आपण म्हणतो. इथे बापूंच्या यशाच्या भागीदारीत त्यांच्या धर्मपत्नींचा वाटा तर आहेच, परंतु त्यांचे दोघे खंदे पुतणे , विलासराव आणि जयसिंगराव यांची साथ त्यांना मोलाची लाभत आहे. मनोहर कोतवाल यांनी जशी साथ दिली, तशीच या दोन समर्थ पुतण्यांची व मुलगे प्रकाशराव, रमेशराव, सुरेश, संदीप यांची साथ बापूंना मिळाली. त्यातल्या त्यात विलासराव म्हणजे हुकमी पायगुणी माणूस. या माणसाच्या पायाने शेंडगे घराण्यात लक्ष्मीने प्रवेश केला. मार्गदर्शन दिले, सुचना, सल्ले दिले. आणि बापूंच्या मतदार संघाची आघाडी जयसिंगराव यांनी सांभाळली. आपल्या मतदार संघात गावागावांतील लोकांच्या अडी अडचणी समजावून घेता याव्यात, त्यांचे निराकरण व्हावे म्हणून जयसिंगरावांनी कवठे महांकाळ तालुक्यात विविध ठिकाणी संपर्क कार्यालये सुरू केली. शेवटी मंत्री पदावर आरूढ झालेल्या लोकप्रतिनिधिला केवळ मतदार संघ पाहता येत नाही. त्याच्यावर साऱया राज्याची जबाबदारी असते. म्हणूनच जयसिंगरावांनी मतदार संघात संपर्क कार्यालय उघडली. घराघरातील आणि गांवागांवातील लोकांशी संपर्क ठेवला. कोणाच्या घरगुती अडचणी. कोणांची कर्ज प्रकरणे, पीक कर्जे, नोकरीची कामे, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची कामे, अगदी सातबारा उताऱयापासून ते जमिंनीच्या नोंदी करण्यापर्यंतची कामे ते करीत आहेत. बापूंनी मुंबईत राहून राज्याच्या लोकांची काळजी करायची आणि जयसिंगरावांनी मतदार संघातील लोंकाच्या अडीअडचणी शासकीय यंत्रणे च्या माध्यमातून सोडवायचे. हे सामाजिक काम थोडे नाही. त्यातल्या त्यात ही सारी कृपा बिरोबाची आणि पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकरांची असेच बापूंचे एक जावई श्री. बाळासाहेब वाघमोडे हेही कर्तृत्ववान, स्वत:च्या राजकीय ताकदीवर ते सांगलीसारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्ष झाले. हे बापूंच्या दृष्टीने कमी महत्वाचे नाही.
बापू केरेवाडीत जन्मले तरी त्यांचा पिंड राजकारणाचा आहे. केरेवाडीत असताना त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवादलात कॉंग्रेसची स्थापना केली आणि सर्वात लहान कॅप्टन म्हणून त्यांचा उल्लेख सेवादलाचे कार्यकर्ते त्यावेळी करीत होते. सेवादलातील पूर्वीची माणसं वेगळया निष्ठेने, देशप्रेमाने भारलेली होती. त्यातच बापूंचा उल्लेख करावा लागेल. अवघ्या चौदा वर्ष वयाच्या वेळी बापू कॉंग्रेस कार्यकर्ते झाले होते. ही गोष्ट आजच्या तरूण पिढीला मार्गदर्शक तर ठरणार आहेच उलट प्रेरणदायी देखील ठरणार आहे. बापूंचे मॅट्रीक पर्यंत शिक्षण सांगलीत झाले. त्यांनी शिक्षण घेतानाही मन लावून घेतले. त्यांचा राजकीय पिंड त्यांना गप्प बसू देत नव्हता. संघटन कौशल्याचा त्यांचा गुण त्यांना पुढील राजकीय आयुष्यात उपयोगी ठरला. माणसं जवळ घ्या., त्यांच्याशी प्रेमानं बोला, अडीअडचणी समजावून घ्या हा बापूंचा संदेश सतत तरूण पिढीला प्ररणा देणारा ठरेल. सन 1957 सालापासून बापू मुंबईत आहेत. स्वत:च्या गरीबीचे गाठोडे स्वत:च्या स्वत:च्या खांद्यावर टाकून बापू मुंबईला गेले आणि मुंबैकर झाले. मात्र जार फिरते आकाशी आणि तिचे लक्ष पिलापाशी या उक्तीनुसार बापू मुंबईत राहीले तरी त्यांचे सारे लक्ष दुष्काळी दुष्काळी कवठे महांकाळ तालुक्याकडे असते. ज्या भागातील जमिनीत साधी कुसळे उगवत नाहीत अशा भागातला हा नेता या भागाच्या विकासासाठी सतत झगडत आहे. संघर्ष करीत आहे. गरीबीविरूद्ध संघर्ष करणे ही कांही साधी गोष्ट नाही किंवा हा संघर्ष करताना काय यातना होतात हे ज्याचे त्यालाच माहीत असते. परंतु बापूंनी प्रसंगी प्रवाहाच्या विरूद्धही जाण्याचा प्रयत्न केला. प्रवाहाबरोबर सारेजण वाहतात. परंतु गरिबीचा प्रवाह कांही औरच असतो. या पार्श्वभूमीवर बापूंनी केलेला प्रवास खडतर, कष्टमयी ठरला आहे. माणसाजवळ त्यागाची भावना असावी. कष्टाची शिदोरी असावी. घाम गाळण्याची तयारी असावी. तरच जीवन फुलते, इतरांचे फुलविता येते असे सतत सांगणारे बापू आजही तत्व आणि मुल्ये जपीत आहेत, जोपासीत आहेत. तत्वाला मूरड घालण्याचे काम त्यांनी कधी केले नाही किंवा संधीसाधूपणाचे राजकारण केले नाही. राजकारणात शत्रू पक्ष असला तरी त्यांच्याशी त्यांनी आकसबुद्धी ठेवली नाही कि सुडाची भावना ठेवली नाही. माणूस हा ब्रम्हदेव नसतो किंवा सर्वगुणांनी युक्त नसतो. त्याला समजून घ्यावे हा बापूंचा पिंड आणि आदर्शही तोच. प्रत्येक माणूस मुळात वाईट नसतो किंवा त्याची मूलत: प्रवृती वाईट नसते. अशांना समजून घ्या, सुधारा, नवजीवन घडवा असे बापू सांगतात. हमाल, कामगार, मालक किंवा श्रीमंत-गरीब असा भे दभाव बापूंनी केला नाही. हमालांचे जीवन म्हणजे आर्थिक हालाखी, कष्टप्रद हालाखी, अशिक्षितपणा या साऱया गोष्टींची बापूंना नेहमी चिंता वाटते. समाजातील सर्वच जातीधर्माच्या, पेशाच्या लोकांनी आपले आर्थिक जीवनमान उंचवावे. अशी त्यांची धारणा आहे. या धारणे तून सत्तेचे माध्यम बनवून त्यांनी कॉंग्रेस आय पक्षात प्रवेश केला. राजकारण आणि सत्ता हे समाजाच्या, लोकांच्या उत्थानाचे माध्यम आहे. असे मानून त्यांनी कवठे महांकाळ सारख्या दुष्काळी भागातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नास बहुतांशी यश आले आहे. तथापी लोकांच्या अपेक्षा वाढतच राहतात. या अपेक्षांना मर्यादा नसते किंवा लोकांनी मर्यादा घालून घ्याव्यात असेही बापूंना वाटत नाही.
मुंबईत राहून केवळ कामगार संघटना स्थापून किंवा चळवळ उभी करून बापू थांबले नाहीत. संघटना स्थापली तरी कामगारांचे, हमालांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवायचे असेल तर सहकारी तत्वावर कामगारांची पतसंस्था निर्माण केली पाहिजे हे बापूंच्या ध्यानात आले. त्यांनी तसा प्रयत्न केला. कामगारांसाठी त्यांनी बॅंक काढली. सहकारात एकमेकांचा हात हातात धरण्याची कल्पना बापूंनी रूजविली. त्यातूनच कामगारांच्या सहकारी बॅंकेने मूर्त स्वरूप धारण केले. या बॅंकेमार्फत कामगारांना कर्जे देण्यात आली. या कर्जावरील व्याज देखील माफक ठेवण्याच्या सूचना बापूंनी केल्या. अनेक कामगारांचे हमालांचे जीवन सुखकर करण्याचा बापूंचा हा प्रयत्न यशस्वी झाला. त्यातून अनेक कामगारांच्या मुलींची लग्न कार्ये, अन्य समारंभ पार पडू लागले. कामगार हमाल मंडळी बापूंना धन्यवाद देऊ लागली. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक अडीअडचणी दूर केल्या की ही माणसं जीवाला जीव देतात असं बापूं नेहमी सांगतात आणि ते खरेही आहे. यशवंत कामगार सोसायटी असो, सांगली जिल्हा कामगारांची बॅंक असो, हमाल मंडळीची संघटना असो, धनगर समाज उन्नती मंडळाची स्थापना असो, बापू नेहमीच आघाडीवर राहत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला तोड नाही. कोण, कुठला, दुष्काळातला माणूस आणि त्याने जिद्दीने, कष्टाने उभी केलेली यंत्रणा हे सारे पाहिले की लोकांना धन्य वाटते. पंढरपूरचा विठोबा भे टल्यासारखे वाटते. प्रत्येक माणसात देव आहे. परंतु त्याचे दर्शन कसे घडवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. त्याच्या प्राकृतीक जडण घडणीतूनच माणूस घडतो. समाज घडतो हे बापूंनी लोकांना दाखवून दिले आहे. शेंडगे बापू आजपर्यंत कार्यकर्तेच झाले. नेत्याची भूमिका स्वत:कडे नको असा त्यांचा स्थायीभाव: नेता झाले की कांही तरी वेगळं आहोत असे त्यांना वाटते. कार्यकर्ता म्हणून राहीले की सर्व सामान्य माणसात वावरता येते. त्यांची सुखदु:ख जवळून पाहता येतात. अशी बापूंची भूमिका त्यामुळेच आज मंत्री असले तरी बापू अन्य मंत्र्याकडे स्वत: कार्यकर्ता असल्यासारखे वागतात. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व शिरसंवाद्य मानून बापूंनी राजकारणाची वाटचाल सुरू ठेवली आहे. सामान्य माणूस विकासाचा केंद्र बिंदू आहे. त्याच्या भोवतीचा विकास कामांचा आढावा तयार केला पाहिजे ही बापूंची राजनिती आहे. सर्वसामान्य माणसांना समजून घेणारे बापू मंत्री झाले तर सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्याशी नम्रपणे आणि सौजन्यांने वागतात. आपण अनेक मंत्री पाहीलेत, अवास्तव आणि बेताल बोलणारे मंत्री पाहीलेत. परंतु बापूंच्या ठायी कधीही बेतालपणा, उर्मटपणा आला नाही. त्यांनी रागलोभ, मत्सर, व्देष या साऱया दुर्गुणुना बाजूला ठेवले. त्यातूनच त्यांचा राजकीय आणि सामाजिक पिंड घडला. अन्याय अत्याचार याविरूद्ध संघर्ष केला, कामगारांच्या शोषणाविरोधी त्यांनी आवाज उठविला. प्रसंगी सत्ताधाऱयाशी दोन हात केला, कामगारांच्या शोषणाविरोधी त्यांनी आवाज उठविला. प्रसंगी सत्ताधाऱयाशी दोन हात केले. त्यातूनच जे पदरी पडले ते कामगार, हमालांच्या पदरात टाकले. मुख्यमंत्री शरद पवार यांचा राजकीय विश्वास त्यांनी संपादन केला. मंत्रीपद मिळाले म्हणून सारं वैभव मिळालं असं त्यांनी कधीही मानलं नाही. त्यांचा तो पिंडच नाही. स्वत:चे एकत्र पद्धतीचे कुटुंब, कुटुंबातील लोकांची प्रत्यक्ष बोलणी, कोणाला काय हवे नको. इथपर्यंत बापू लक्ष घालतात. एवढे असूनही स्वत:ची पन्नास वर्षापूर्वीची गरीबी, दारिद्रय ते विसरले नाहीत. गतकाळातल्या आठवणी ते आजही लोकांना सांगतात. माणूस मोठा झाला की पाठीमागचं विसरतो. मागे वळून पाहण्याची वृत्ती राहत नाहीत. परंतू दगड धोंडे, माळरान, पाऊस नाही, शेती असूनही उपयोग काय? सारेच कसे भयान आणि मग्न असं बापू सांगतात अर्थात हा त्यांचा जाणतेपणाच म्हटला पाहिजे.

No comments:

Post a Comment