Thursday, 22 December 2011

माझी आई

माझी आई

भारतीय संस्कृतीमध्ये आईविषयीची थोरवी `मातृदेवो भव' अशीच आहे. स्वत:च्या उदरात नऊ महिने पोसलेला जीव जन्माला घालतानाच्या आईच्या वेदना समजून घेणारे विरळाच. आई म्हणजे त्यागमूर्ती असंच तिचं रूप परंपरेनं आपल्यापुढे येतं; पण या उदात्तीकरणाच्या प्रतिमेमुळं आईमधलं माणूसपण हिरावलं जातं का? याकडे डोळसपणे बघण्याची वेळ आता आली आहे. आई आत्मनिर्भर असेल तर निश्चितच पुढची पिढी कणखर, जबाबदारीचं भान असणारी होईल. मातृदिनानिमित्त संजय संगवई, माधव गवाणकर आणि डॉ. अभिजित वझे यांचं आईबरोबरचं नातं उलगडण्याचा प्रयत्न सोबतच्या लेखांमधून दिसून येतो.
लहानपणी गावाकडे स्त्रियांचं दबलेपण पाहिलं तसं आपलं कुटुंब, मुलं, घर नीटनेटकं ठेवणं, त्यावर नियंत्रण ठेवणं, किंवा नीटनेटकं न राहता कह्यात मात्र ठेवणं इत्यादी अनेक प्रकार पाहत आलो. घरच्या बाईचा स्वभाव व क्षमतेनुसार नवऱ्यासहित मुलांना, घरच्या व्यवस्थापनाला व बाहेरच्या संबंधांना (परराष्ट्न् व्यवहार!) आकार मिळतो ते पाहत आलो. आमच्या बिरादरीतल्या आज्यांपासून मामी-मावशींपर्यंतची कुटुंबही त्यांच्या नावानं (ही) ओळखली जात आली. पुरुषमाणसं जरा दबूनच. पुरुष म्हणून ते बायकोला पिचतच मारतीलही; पण कर्तव्यशून्य! घरासंबंधी निर्णय व व्यवस्थापन हा बायांचाच प्रांत असायचा. अर्थात, अंतिमत: पुरुषाचा (नवरा, मुलगा, जावई) निर्णय महत्त्वाचा असला तरी बाईची इच्छा व आग्रह (तगादा!) हा निर्णायक राहत आला. तसं नसतं तर अमुक घर उभं केलं/ बरबाद केलं हे पुरुष व स्त्रियांच्या बाबतीतही म्हटलं का जातं?
आईच्या वाढविण्याच्या पद्धतीनुसार, स्वभावानुसार मुलं घडतात, बिघडतात हे सतत दिसताना त्या-त्या स्त्रियांचं काही करणं, न करणं, अक्षम असणं, त्यांना दाबणं, त्यांनी पुढे येऊन करवून घेणं किंवा हवं तसं वाढू देणं (पूर्वीचं, आजचं नव्हे!) हे सर्वच त्याज्य कुटुंबाच्या व माणसांच्या- पुरुष व स्त्रियांच्या-आयुष्यात व एकंदर जगण्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे दिसत होतं. माझे अनेक आजोबा, काका, मामा समजूतदार होतेच, बाई जर स्वत: ठणकावून (रीीशीींर्ळींशश्रू) निर्णय घेत असेल तर ते मानायचे. पारंपरिक म्हणजे सगळं वाईट असं नाही. आपणच तेवढे विचार करणारे व मागची पिढी `मागास', पुढची पिढी भिकार हा आत्मगौरव किंवा स्वसंरक्षणाचा मार्ग झाला. असो.
पुरुष म्हणून घडताना कुटुंबाच्या स्तरावर बाईची भूमिका किती कळीची असते, जर तिने ठणकावून निर्णय घेतले, तर बाकी परिस्थिती ही देखील बदलते हे जसं दिसत होतं, तसं एक व्यक्ती किती निर्मितीक्षम सर्जनशील असते, आपल्या घरचं किंवा आसपासचं वातावरण ती कसं बदलते हे माझ्या आईकडे दूरस्थपणे पाहताना जाणवतं. एक स्त्री म्हणून व विशिष्ट परिस्थितीमुळे झालेली मानहानी, अगदी जवळच्या तसेच पोटच्या गोळयांकडून या म्हाताऱ्या अवस्थेपर्यंतही मिळणारी अपमानास्पद हिडिस-फिडीस, तुच्छता या सगळयांना पचवीत ही बाई एकटी गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ खंबीरपणे उभी आहे. केवळ उभी नाही तर तिनं एक उत्तम घर उभं केलं आहे. समाजात स्थान मिळवलं आहे अन् माणसं सांभाळली आहेत, त्यांच्यासाठी केलं आहे. यापैकी एकही गोष्ट माझ्यात नाही.
ती म्हणते, हे सर्व तिच्या आईकडून तिला मिळालं. जगण्यातला नीट-नेटकेपणा, स्वच्छता, स्वयंपाकापासून घर, कपडे, अंथरूण-पांघरूण, कपड्यांची निवड इथपासून बारा वर्षं बिनातक्रार चालणारा फ्रीज, योग्यवेळी बदलायची भांडी, पडदे, चादरी अशा कितीतरी ठिकाणी तिचा हात लागला की ती वस्तू स्वच्छ होते, लखलखीत दिसते. सर्व घर सुरेख लागतं, स्वच्छ होतं. त्यावर फुलांच्या फुलदाण्या असतात. लहानशाच; पण तिनंच वाढवलेल्या कुंड्यांतून व अडचणी-ताणातून वाढवलेल्या सोसायटीच्या परसातली फुलं.
हे समोरचं डवरलेलं कडुनिंबाचं झाड म्हणजे आईच्या दहा-पंधरा वर्षांच्या संघर्षाचं प्रतीकच आहे. कितीजण त्या निंबाला तोडायला आले होते, किती विरोध- तरी आज हा परिसरात सावली, शुद्ध हवा देत उभा आहे; पक्षी येताहेत, अन् भोवताल हिरवा होऊन जातो.
अन्न हा तिच्यासाठी फार महत्त्वाचा विषय. कमीत कमी वस्तूत, स्वादिष्ट व पौष्टिक अन्न तयार करावं ते आईनंच. तिच्या हाताची चव तर आमच्या कुटुंबात व मित्रमंडळीत माहीत आहे. मसाले, झणझणीत बाजारी वस्तू यांची नावड ही तिच्याकडून माझ्यात आली. भाज्यांना, धान्याला त्यांची स्वत:ची चव असते. सर्व रस पोटात जावे, अन्न पौष्टिक असावे म्हणजे चविष्ट नसावं असं नाही. अन् चव ही वस्तू अमुक चमचे टाका, ती तितके ग्रॅम घ्या असं तयार होत नाही. जेवणारा आपला माणूस आहे. त्याच्यासाठी आपलेपणानं मन मिसळून केलेलं साधंच अन्न सुंदर होतं. हे तर मी लहानपणापासून अनुभवतो. तिच्या हातची ज्वारीची भाकरी, खोबऱ्याची चटणी अन् दूध किंवा दही. तिचं साधंसंच वरण, सुरेख भाज्या, चटण्या या देवदुर्लभ आहेत. साध्या पोळयाही कशा करायच्या, ताक करताना आलं, जिरं... वगैरे कितीतरी... अन् ते तेवढंच औषधी असतं- चविष्ट, औषधी.
तिच्या स्वयंपाकाचाच परिणाम म्हणून जे परंपरागत राहत आलं ते माझ्यासारखा जवळ जवळ मरणपंथाला गेलेला माणूस पुन्हा एकदा काम करतो. आयुर्वेदीय औषधांबरोबर तिचं अन्न रोगहारक आहे. ती स्वत: क्रॅन्सरसारख्या रोगातून बाहेर पडली ती ऑपरेशन व केमोथेरपीपेक्षा तिच्या अन्नामुळे. ज्या वेळी केमोथेरपी यातनांचा अंत पाहत होती व डॉक्टर दुसऱ्या ऑपरेशनचा आग्रह करत होते, त्या वेळी तिनं स्वत: निर्णय घेतला. यापुढे माझ्या शरीरात रासायनिक औषधं जाणार नाहीत. माझं काय बरं-वाईट होईल ते मी माझं पाहीन. शरीर माझं आहे.
अन् केमोच्या काळात तिचा वेदनेनं तळमळणारा देह पुन्हा उभा राहिला, केवळ तिच्या अन्नावर, अन् आयुर्वेदिक औषधांवर त्या औषधांचा ती पूरक म्हणून उपयोग करते. एक वर्षापूर्वी केमोथेरपीमुळे लुंजपुंज झालेली बाई स्व-बळावर व्यवस्थित घर राखते, स्वच्छ ठेवते, मोठ्या पोराला सांभाळते, दळण आणण्यापासून कापडं, वाणसामान आणते. मुलांना घरचे पदार्थ मुंबईला पाठवते नाराजी सहन करूनही.
आमच्या घरात दोन मोठे रोग सोडले तर सर्दी, ताप, डेंग्यू, चिकुनगुण्या आमच्या आसपासही फटकत नाही. याचे कारण म्हणजे भाज्या-डाळींनी परिपूर्ण अन्न व घरच्याघरी होणारे काढे व अन्य उपाय.
स्वत:ला व इतरांना उभं करण्याची तिची चिकाटी अजब आहे. दहावीला मेरिट लिस्टमध्ये आल्यावरही मेडिकलला न जाता आर्ट्सला जाण्याच्या, पुढे पत्रकार व नंतर नर्मदा संघर्षात जाण्याच्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी ती खंबीरपणे माझ्या मागे उभी होती. माझ्या मेडिकलला न जाण्यासाठी तिनंच रोष पत्करला. ``ताईच्या मुलासारखं झोळीवाला व्हायचं नाही बरं तू'' असं जवळचे नातेवाईकही मुलांना सांगत त्याकाळी.
नर्मदेला असताना आई घरात एकटी. त्याकाळात तिचं भावविश्व कोलमडलं होतं. पुन्हा पन्नाशीत घर उभं करायचं होतं- एकट्यानं. एकटं व्हावं लागलं हा जणू तिचाच अपराध असल्यासारखी जवळच्यांची दृष्टी तिनं कशी सहन केली. त्यातून पुण्यासारख्या ठिकाणी एकटं घर उभं करणं, सर्वांचं स्वागत करणं, मीही पाहुण्यासारखा येऊन जायचो. ती बडोद्याला, मणिबेलीला यायची, थकून, धापा टाकीतही आंदोलनांच्या कार्यक्रमात असायची. सर्वांचं कौतुक करणार, जेवू घालणार. अशा वेळी तिच्याशी किती कोरडेपणानं वागत होतो ते आठवलं की अपराधी वाटतं.
या काळात तिनं सर्वांची उस्तवारी केली, बाळंतपणं केली, इतरांनी विनवलं म्हणून कमीपणा घेऊन त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न केले. सततच्या मानसिक ताणाचा तिच्यावर परिणाम झाला. स्वत:ला सर्दीपडसं होऊ न देणाऱ्या व्यक्तीला क्रॅन्सर झाला. केमोच्या वेदनादायक काळातही जवळच्या म्हणवणाऱ्यांनी बोटसुद्धा लावलं नाही; नातवंडांना तिला भेटू दिलं नाही. उलट काहींनी तर शाब्दिक हल्ले केले. ते सर्व सांभाळून ती उभी राहिली. नव्हे सतत काहीतरी नवं लिहीत राहिली.
कितीतरी वर्षांपासून ती लिहिते आहे. अगदी `आेंजळ' काव्य संग्रहापासून `मराठा'तले ललितलेख, पुढे `पुरुषार्थ विचार' व आता `मुक्ताई'वर प्रबंध, संत साहित्यावर स्फुटलेखन सततच असतं. सगळं करून झालं की ती खास बनवलेलं टेबल घेऊन लिहीत राहते- तिची दहा पुस्तकं आली- त्याची तेवढी दखल घेतली गेली नाही. संमेलनाला तिला बोलावत नाहीत. तरी तिचं लिखाण सुरू आहे. मलाही ती म्हणते, ``असं फुटकळ कारकुनीवजा किती लिहिणार, काही तरी तुझं, ठोस लिही.''
आज तिचे आमच्या आसपास किती संबंध आहेत? ती समोर भाजी आणायला जाईस्तोवर पाच-दहाजण भेटतात. बोलणं होतं, आमच्या आजोळच्या सर्व नातेवाइकांना जोडून ठेवलंय. ``माझ्याशी कुणी कसेही वागो; तू भावाबहिणींशी नीट वाग'' असा तिचा आग्रह असतो. समाजाच्या विविध स्तरांवर- कलकत्त्याच्या कुलगुरूंपासून, इथल्या प्रकाशकापासून मराठवाड्यातल्या लेखकांपर्यंत, मेहुणपासून ठाण्यापर्यंतच्या वारकरी भक्तांना, विद्वानांना ती माहीत आहे; जोडून ठेवते.
कोणतीही व्यक्ती निर्दोष नसते. मतैक्यच होतं असं नाही. तिची राजकीय, सामाजिक मतं ठाम आहेत. ती म्हणते, ``माझ्या अनुभवातून बोलते. तुम्हालाही अनुभव येईल. तोवर वेळ निघून गेली असेल.'' गांधींचं, तिला अप्रूपच आहे. समाजवादी प्रभावहीन आहेत असं तिचं निरीक्षण आहे. लहानपणापासून चांगले लेखक, उपनिषद- गीता, संस्कृत, मराठी-साहित्यिक वाचायला उद्युक्त करणाऱ्या आईला आंतरराष्ट्नीय भान आहे. बुश, मुशर्रफ हे तिच्या हसण्याचे विषय आहेत.''
ह्नह्नह्न

No comments:

Post a Comment